If there are any errors in the script or the narration, please send a note to sriram@gurukula.com
महाभारत हे व्यास महर्षींचे संकल्पित काव्य आहे. त्यांना हा ग्रंथ योग्य व्यक्तीकडून लिहून घ्यायचा होता. मग याबाबत त्यांनी ब्रह्मदेवाचा सल्ला घेण्याचे ठरविले. ब्रह्मदेवानी त्यांना श्रीगणेशाचे नाव सुचवले. श्रीगणेश हेच महाभारत लिहिण्यासाठी योग्य आहेत असे सांगितले. व्यासांनी श्रीगणेशाला महाभारत लिहिण्यासाठी विनंती केली.
श्रीगणेशाने ते मान्य केले पण एका अटीवर. ते म्हणाले “मी हे करेन, पण मी लिहीताना कधीही थांबणार नाही, आणि तुम्ही सुद्धा सांगणे थांबवायचे नाही.” व्यास थोडा विचार करत म्हणाले “देवा ! मी थांबणार नाही, तुम्ही फक्त प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्या आणि मग लिहा.” श्रीगणेश हसले त्यांना व्यासांची बुद्धिमत्ता आवडली.
व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली. कथा सांगताना मधेच महर्षी व्यास काही अवघड श्लोक सांगायचे. श्रीगणेश ते श्लोक समजून घ्यायला काही क्षण थांबायचे. या वेळेत व्यास पुढच्या श्लोकांची तयारी करून घ्यायचे. अशाप्रकारे महाभारत या महान ग्रंथाची रचना झाली.
महाभारतामध्ये एक लाखांहून अधिक श्लोक म्हणजेच सुमारे दोन लाखांहून अधिक ओळी म्हणजे जवळ जवळ वीस लाख शब्द !!
संदर्भ द्यायचा झाला तर आज आपण ज्या कथा, कादंबऱ्या वाचतो त्यात साधारण वीस ते चाळीस हजार शब्द असतात. हॅरी पॉटरच्या सर्व सात पुस्तकांमधे सुमारे दहा लाख शब्द आहेत. लॉर्ड ऑफ द रिंग्स च्या तिन्ही पुस्तकांमध्ये मिळून सुमारे पाच लक्ष शब्द आहेत. यातील कोणतेही पुस्तक महाभारताच्या जवळदेखील जात नाही. रामायणसुद्धा महाभारताच्या साधारण एक चतुर्थांश एवढेच आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर कोणत्याही काळातल्या, कोणत्याही प्रदेशातल्या लोकांना लागू होईल अशी ही महाभारताची गोष्ट आहे. पांडव आणि कौरवांमधे खरेतर घरगुती वादामुळे शत्रुत्व आले आणि त्याची परिणीती विनाशकारी युद्धात झाली. जरा खोलात जाऊन विचार केला तर आपल्या सहज लक्षात येते की मत्सर आणि अन्याय या भावनाच वादाला कारणीभूत होत्या. युद्ध न करता देखील हे प्रश्न सोडवता आले असते.
आयुष्यात बरेचदा आपण असेच पेचात पडतो. कधीतरी खूप महत्वाच्या आणि आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी नंतर मात्र निरर्थक वाटू लागतात. शक्ती, पैसा, प्रसिद्धी हे हवंहवंसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मात्र ते कमावताना आपला हेतू चांगला आहे ना, याची आपण खात्री करून घ्यायला हवी. जर आपल्या मनात क्रोध, मत्सर, अहंकार या भावना असतील, तर त्याचं फळ विनाशकारी असेल, हे नक्की !